चंद्रपूर - ऊर्जानगर परिसरातील समतानगर येथे एका सलून व्यावसायिकाने सोमवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वप्निल चौधरी (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुण सलून व्यवसायिकाचे नाव आहे. अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, आर्थिक अडचणीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. त्यामुळे सलून बंद आहेत. यातूनच निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीतून या तरुण सलून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ऊर्जानगर परिसरात समतानगर येथे स्वप्निल चौधरीचे सलून आहे. मार्च महिन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरविले. त्यामुळे २१ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून उद्योगधंदे बंद आहेत. स्वप्नील चौधरी याचे दुकानही मार्च महिन्यापासून बंद पडले होते.
दुकान बंद राहिल्याने स्वप्निल चिंतेत होता. सोमवारी शेजारी राहणाऱ्या एका युवकाने स्वप्निलला उठविण्यासाठी आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी दार उघडून बघितले असता स्वप्नील गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. त्यानंतर याची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. त्याला आई-वडील नसल्याने स्वप्नील घरी एकटाच राहत होता.
लॉकडाऊनचा मोठा फटका सलून व्यवसायिकांना बसला आहे. 17 जूनला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सलून व्यवसायिकांना दुकाने सुरू करण्याची मागणी नाभिक संघाने केली आहे. अन्यथा 18 जूनला राज्यव्यापी जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.