अबुधाबी : कोरोनाला लढा देण्यासाठी युएईमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे. सिनोफार्म सीएनबीजीच्या इनअॅक्टीव्हेटेड लसीची अबुधाबीमध्ये चाचणी सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिलेली ही पहिलीच लस आहे.
अबुधाबीच्या आरोग्य विभागाचे प्रमुख, शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद अल हमीद यांनी या चाचणीचा शुभारंभ केला. त्यांच्यावरच या लसीच्या तिसऱ्या टप्प्याचा पहिला प्रयोग करण्यात आला. त्यानंतर दुसरी चाचणी विभागाचे कार्यवाही अध्यापक डॉ. जमाल अल काबी यांच्यावर करण्यात आली. असे करून त्यांनी लोकांना आपला या लसीवर असलेला विश्वास, आणि कामाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली.
अबुधाबीमधील जी-२४ हेल्थकेअर आणि सिनोफार्म सीएनबीजी (जगातील सहावी सर्वात मोठी औषध निर्माण कंपनी) हे संयुक्तपणे या लसीची निर्मिती करत आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी १,५०० स्वयंसेवकांना निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी यूएईला निवडण्याचे कारण म्हणजे, तिथे सुमारे २०० देशांमधील नागरिक एकत्र राहतात. त्यामुळे, अधिकाधिक ठिकाणच्या लोकांची चाचणी एकच वेळी घेणे, आणि त्या त्या लोकांवर ही लस कशी परिणाम करते हे पाहणे सुलभ होणार आहे.
सिनोफार्मने याआधी चीनमध्ये या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या होत्या. यांना १०० टक्के यश मिळाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे. ४२ दिवस ही प्रक्रिया सुरू असणार आहे.