जालना- कंपनीच्या प्रवेशद्वारात वेळेवर उभे असतानाही पंचिंग मशीनमध्ये हजेरी लावण्यात कामगाराला उशीर झाला. त्यामुळे व्यवस्थापना सोबत भांडण होऊन कामगाराने कंपनीच्या मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
नवीन औद्योगिक परिसरात एलजीबी या नावाने बेरिंग बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये कंत्राटी स्वरुपात काही कामगार काम करतात. त्यानुसार प्रकरणातील तक्रारदार कामगार गणेश किशन धायडे ( वय 24) आज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी एल.जी.बी कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथील प्रवेशद्वारावर कामगारांच्या कोरोना तपासण्या सुरू होत्या. त्यासाठी रांगही लागलेली होती. त्यामुळे धायडे याला पंचिंग करण्यासाठी 7 मिनिटे उशीर झाला. म्हणून या प्रकरणातील आरोपी मनुष्यबळ विभागाचे प्रमुख राजदीप सिंग यांनी धायडे याला कामावर उशीर झाल्यामुळे अर्ध्या दिवसाचा पगार मिळेल असे सांगितले. मात्र धायडे यांनी आपण वेळेत कंपनीत आलो आहोत, त्यामुळे अशी कारवाई करू नये, असे सांगितल्यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद वाढला आणि शिवीगाळ करून मारहाण झाली.
याप्रकरणी गणेश धायडे यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात कलम 504, 506 अन्वये कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. कोरोना चाचणीमुळे एखाद्या कर्मचार्याला झालेला उशीर आणि त्यामधून कामगार आणि कंपनीमध्ये वाढलेल्या वादातून गुन्हा दाखल होणे ही जालना जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.