सोलापूर - देशात यंदा कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासुन देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे शाळा बंद असल्याने अनेक पालकांनी दहावी, अकरावीत शिक्षण घेणाऱ्या मुलींचा विवाह लावून दिला आहे. महिला व बालविकास विभागाच्या यंत्रणेकडून जानेवारी ते ऑगस्टदरम्यान राज्यात 255 बालविवाह रोखण्यात आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन काळात सर्वाधिक 31 बालविवाह रोखण्यात आले, अशी माहिती जिल्हा बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.
मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा समाजातील सर्व घटकांवर परिणाम झाला. या दरम्यान, मोठ्या प्रमाणावर बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हेच चित्र पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे अज्ञान याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. हलाखीची कौटुंबिक परिस्थिती हेच प्रमुख कारण त्यामागे असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. असे असले तरी मात्र, सुशिक्षित पालकांनीही त्यांच्या मुलीला चांगले स्थळ आले म्हणून 18 वर्षे होण्यापूर्वीच विवाह लावून दिल्याचेही समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 31 बालविवाह रोखण्यात आले असून, तर नाशिक, धुळे, भंडारा, उस्मानाबाद, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 14 बालविवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकावरील असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात 22 बालविवाह रोखण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय रोखलेले बालविवाह -
सोलापूर (31), औरंगाबाद (22), बीड (12), हिंगोली (10), नाशिक, धुळे, भंडारा, उस्मानाबाद व यवतमाळ (प्रत्येकी 14), जालना (16), लातूर (13), रत्नागिरी, नांदेड, नागपूर (प्रत्येकी दोन), परभणी (4), अमरावती, नंदुरबार, ठाणे (प्रत्येकी तीन), अकोला, गडचिरोली, मुंबई (प्रत्येकी एक), बुलडाणा (9), वाशिम, वर्धा (7), पुणे (6), कोल्हापूर, नगर (8), सांगली, सातारा (प्रत्येकी पाच).
राज्यातील यंदाची स्थिती -
अंदाजे बालविवाह - 300 पेक्षा अधिक
रोखलेले बालविवाह - 255
पोलिसांत प्रथम माहिती अहवाल - 25
चौकशी सुरू असलेले प्रकरण - 280