मोहाली - आयपीएल २०१९ मध्ये ८.४ कोटीर रुपयांत विकत घेतलेला खेळाडू वरुण चक्रवर्तीला प्रभावी कामगिरी करता आली नाही. लिलावात त्याच्यावर मोठी बोली लावल्याने साऱ्यांच्या नजरा त्याच्या कामगिरीवरच होत्या. या मौसमात त्याने केवळ एकमेव सामना खेळला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील फिरकीपटू वरुण बुधवारी दुखापतीमुळे बाहेर पडला. तो बाहेर पडल्याने पंजाबला चांगलाच धक्का बसला आहे. चक्रवर्तीने या मौसमात कोलकात्याविरुद्ध एकमेव सामना खेळला होता. त्यात ३ षटकात ३५ धावा देत १ गडी बाद केला होता.
त्याला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. ती अद्याप बरी झाली नाही. त्यामुळे तो बरेच दिवस बाहेर होता. आता मात्र, संपूर्ण आयपीएलमधूनच तो बाहेर पडला आहे.
वरुणने तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला पंजाबने जास्त बोली लावून पंजाबच्या संघात घेतले होते. मात्र, कोलकात्याच्या सामन्यात फलंदाजांनी त्याची गोलंदाजी चांगलीच फोडून काढली.