पुणे - कोरोना साथ कमी होण्यासाठी पुण्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. शहर पूर्णपणे बंद झाले आहे, पण पाण्यासाठी उरुळी देवाची गावामधील लोकांची पाणी टँकर भोवती प्रचंड झुंबड उडाली आहे. ए ग्रेड महापालिका असूनही उरुळी देवाची या गावात दुष्काळी भागासारखी परिस्थिती झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी व राजकीय पक्षातील नेत्यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे तक्रारही केली, मात्र समस्या अद्याप जैसे थेच आहे.
पाणी नसल्याने ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी एकत्र येत काळी फित लावून मोठ्या संख्येने आप आपल्या घरासमोर आणि चौकात एकत्र येऊन, तसेच डोक्यावर हंडा घेऊन महापालिकेचा निषेध केला होता. लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावात पाईपलाईन पोहोचवली, मात्र पाणी पुरवठा झाला नाही.
सध्या जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे टँकरला होणारी गर्दी टाळून पाईपलाईननेच पाणी पुरवठा करावा, अशी मागणी भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी महापालिका आयुक्तांना केली होती. मात्र, पालिकेने या मागणीची दखल घेतली नाही. परिणामी आज गावात पाण्यासाठी टँकर भोवती गर्दी होऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. गावकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी महापालिकेला जबाबदार धरले जाईल. म्हणून आठ दिवसात बंद नलिकेद्वारे उरुळी गावाला पाणी पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी गावकरी करत आहे.