जालना- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी आज शहर वाहतूक शाखेचे पोलीस आले होते. मात्र सर्वच वाहनचालकांनी दंड भरल्यामुळे वाहन उचलण्यासाठी आलेले वाहन रिकामे परतले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 3 मजली इमारतीमध्ये विविध विभागांची अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी नो पार्किंगमध्ये आपली वाहने लावली होती. या अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे 4 चाकी वाहने लावण्यासाठी अडचण येत होती. त्यातच सध्या कोविड 19 या आजारा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांवर बैठका सुरू आहेत, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांची ये जा वाढली आहे. मात्र दुचाकी वाहनांमुळे चार चाकी वाहने लावायला जागाच मिळत नव्हती. पर्यायाने इथे वाहनांची कोंडी व्हायची. ही अडचण लक्षात घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलावून ही समस्या सोडविण्यास सांगितले होते.
त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास नाडे, कर्मचारी डी.आर. बरले, गंगाधर गोल्डे, जयलाल सुंदरडे, भगवान नागरे, पूनम सिंग गोलवाल आदी कर्मचार्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजर झाला. मात्र ही सर्व वाहने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीच असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतली. मात्र वरिष्ठांनी देखील दंड भरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे 27 वाहनचालकांना नियमानुसार दंड भरावा लागला आहे. दंड न भरणाऱ्या वाहनांना उचलून नेण्यासाठी पोलिसांनी दुसरे वाहनही बोलवले होते, मात्र त्याची गरज पडली नाही. सर्वच दुचाकी वाहन चालकांनी दंड भरल्यामुळे दुचाकी नेणारे वाहन रिकामेच गेले.