मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यानुसार 2020-21 या आर्थिक वर्षात एमएमआरडीएने मेट्रोवर विशेष भर दिला असून मेट्रोवर तब्बल 6737 कोटी 90 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
एमएमआरडीकडून एमएमआरमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. त्यानुसार मुंबईत सध्या अंदाजे 13 मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 हे दोन मार्ग पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहेत. तर उर्वरित मार्ग ही येत्या काही वर्षांत पूर्ण करण्यावर भर आहे. एमएमआरडीएने 2020-2021या आर्थिक वर्षासाठी 15819.49 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातील तब्बल 6367.90 कोटी इतकी रक्कम केवळ मेट्रोवर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती बी. जी. पवार, सहमहानगर आयुक्त यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पातील आकडेवारीनुसार दहिसर-मानखुर्द मेट्रो 2 अ वर 919.45 कोटी, डी एन नगर -मंडाले मेट्रो 2 ब मार्गासाठी 600 कोटी, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 साठी 600 कोटी, वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 साठी 1287.20 कोटी त,र कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ साठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 384 कोटी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 साठी, 803 कोटी कोटी स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 साठी, 1022.25 कोटी अंधेरी ते दहिसर मेट्रो 7 साठी, 500 कोटी दहिसर ते मिरारोड मेट्रो 9 साठी, 58 कोटी गायमुख-शिवाजी चौक मेट्रो 10 साठी, 56 कोटी वडाळा-सीएसएमटी मेट्रो 11 साठी, 46 कोटी कल्याण-तळोजा मेट्रो 12 साठी तर 25 कोटी घोडबंदर-विरार मेट्रो 13 साठी खर्च करण्यात येणार आहेत.
सर्व मेट्रोच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी मुंबईत मेट्रो भवन बांधण्यात येणार आहे. या मेट्रो भवनासाठी 100 कोटी तर, मेट्रो कर्मचाऱ्यांचा विचार करता त्यांच्या निवासस्थानासाठी 25 कोटी खर्च करण्यात येणार आहे. तसेच, मेट्रो संचलन मंडळासाठीही तरतूद केली असून यासाठी सुमारे 212 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. या अर्थसंकल्पातील ही तरतूद पाहता एमएमआरडीएसाठी मेट्रो प्रकल्प महत्वाकांक्षी असल्याचे चित्र दिसत असून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याकर भर दिला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा भविष्यातील प्रवास सुकर करण्याच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक मानली जात आहे.