बदनापूर (जालना) - बदनापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत नुकत्याच झालेल्या पावसामुळे बँकेचे छत गळत आहे. गळणाऱ्या छतातील पाण्यामुळे मोठया प्रमाणात पाणी साचत आहे. तसेच बँकेतील विज पुरवठा सुरळीत रहावा म्हणून असलेला युपीएसही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. छतातून पाणी टपकत असल्यामुळे आणी तांत्रिक अडचणीमुळे या शाखेतील कामकाज मागील चार ते पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे पीक कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी ही शाखा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यांनाच त्रासदायक ठरत आहे.
बदनापूर शहरात पहिली राष्ट्रीयकृत बँक म्हणून बॅक ऑफ महाराष्ट्रच्या बदनापूर शाखेकडे पाहिले जाते. मोठया संख्येने आजूबाजूच्या गावकऱ्यांचे विविध बँक खाते तसेच सरकारी, निम सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन खातेही या बँकेत आहेत. या बँकेमार्फत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात पीक कर्जही वाटप करण्यात येते. यंदाही कोरोनामुळे सुरू असलेल्या सामाजिक अंतराचा शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून या शाखेचे शाखा व्यवस्थापक चेतन वानखेडे यांनी पुढाकार घेऊन शाखेत गर्दी होऊ नये या उददेशाने प्रत्यक्ष गावात जाऊन शिबिरे घेतली आहेत.
त्या त्या गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज नुतनीकरण आणि नवीन कर्जासाठीचे अर्ज भरून घेतले. मात्र, मागील आठवडयात झालेल्या पावसामुळे या शाखेचे छत गळायला लागले. छतातून सारखे पाणी गळत आहे. त्यामुळे या ठिकाणी विजेचा योग्य पुरवठा व्हावा म्हणून ठेवण्यात आलेल्या युपीएस बँटऱ्याही बंद पडल्या. या तांत्रिक अडचणीमुळे संगणक चालू नसल्यामुळे बँकेचे कामकाज सलग चार ते पाच दिवसांपासून बंद आहे. सध्या पीक कर्जाची शेतकऱ्यांना अतिशय निकड असताना आणि शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन कागदपत्रे जमा करून आणलेली आहेत. परंतू गळणाऱ्या छतामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे संगणक सुरूच करता येत नसल्याने बँक पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप करू शकत नाही. या बाबत येथील शेतकरी आणि ग्राहकांनी वेळोवेळी या बाबत बँक प्रशासनाकडे तक्रारही केलेली आहे. त्याच प्रमाणे काही ग्राहकांनी मागील एक वर्षांपासून बँक व्यवस्थापनाच्या कानावर या शाखेतील तांत्रिक अडचणी सांगून उपाययोजना करण्याचे सुचित केले असतानाही बँक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या शाखेतील कामकाज ठप्प होत आहे.
मागील वर्षीही या शाखेत पाणी साचून कामकाज ठप्प झाले होते. असे असतानाही बँक प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा आहे. ही शाखा जुनी असल्यामुळे तालुक्यातील प्रमुख सरकारी, निमसरकारी कार्यालयाचे वेतन खाते तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज खाते याच शाखेत आहेत. असे असतानाही शाखेकडे महाराष्ट्र बँक प्रशासन दुर्लक्ष का करत आहेत, या बाबत शंका उतस्थित केल्या जात आहे. येथील प्रगत शेतकरी संतोष पवार यांनी सांगितले की, ही शाखा जुनी असून अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे तांत्रिक अडचणींची पूर्तता न झाल्यामुळे या बँकेचे कामकाज मागील आठवडयापासून बंद आहे. यामुळे ऐन हंगामात पेरणीसाठी गरज असताना शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची हिरमोड होत आहे.