ठाणे - कळवा - ठाण्याला जोडणाऱ्या खाडीवरील नवीन उड्डाणपूल ठाणे महानगर पालिका आणि संबंधित ठेकेदाराने खाडी प्रवाहाजवळ साठ ते सत्तर टक्के मातीचा भराव टाकून बुजवलेला आहे. त्यामुळे खाडीला भरती आल्यानंतर ही सर्व माती खाडीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात आहे. यासंदर्भात ठाणे मनपा आणि संबंधित ठेकेदाराला जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्त साधून मनसेने प्रतिकात्मक शुभेच्छा दिल्या आहेत.
या पुलाच्या कामामुळे नैसर्गिक जीवचक्राचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे मनसेने पालिका प्रशासनाला वेळीच जागे होण्याची विनंती केली आहे. काम पूर्ण होण्याआधी निसर्गाचा ऱ्हास रोखणे आणि कामाचा दर्जा याच्यावर नियंत्रण ठेवावे, असे देखील मनसेच्यावतीने सुचवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित आणि विधि विभागातर्फे ठाणे मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांना कामाच्या गुणवत्ता आणि दर्जा याच्यासंदर्भात निवेदन दिले आहे.