सिंधुदुर्ग - राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने या परीक्षा उधळून लावण्याचा इशारा दिल्याने या परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली येथील जिल्ह्याच्या तिन्ही केंद्रांची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या परीक्षेला ८७५ उमेदवार बसणार आहेत.
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत असून मराठा समाजातील नेते देखील आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
मात्र, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्वच प्रकारच्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात याव्यात अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. तर, मेगा पोलीस भरती व राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी खुद्द संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले होते. मात्र असे असुनही पूर्व परीक्षा ठरलेल्या तारखेला म्हणजे ११ ऑक्टोबरलाच होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला असुन आरक्षणाचा निकाल येईपर्यंत परीक्षा रद्द न केल्यास त्या उधळून लावू असा इशारा देण्यात आला आहे.
य पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिन्धुदुर्ग पोलीस प्रशासन सतर्क झाले असून आज पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांसोबत कणकवलीतील केंद्रांची पाहणी केली.यावेळी त्यांनी केंद्रातील बैठक व्यवस्थेची माहिती घेतली. तर कणकवली पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला.
एमपीएससी परिक्षेसाठी जिल्ह्यात ३ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यात कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेजमध्ये २५० उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. विद्यामंदिर हायस्कुल मध्ये २५० उमेदवार तर एस. एम. हायस्कुल कणकवलीच्या केंद्रावर ३७५ उमेदवार परीक्षा देणार आहेत.