वर्धा - जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कन्टेन्मेंट झोनही वाढत आहे. यामुळे आज प्रशासनाला वितरणाच्या कारवाईचा फटका बसला. झाले असे की, शहराच्या मालगुजारीपुरा येथील कन्टेन्मेंट झोनमध्ये खुद्द अधीक्षक अभियंता अडकले. यावेळी त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये थाटण्यात आलेल्या मंडपाला विनापरवाना लाईन पुरविली जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर विद्युत कर्मचाऱ्यांनी जाऊन क्वारंटाईन सेंटरमधील लाईन कट करत प्रशासनाला झटकाच दिला.
वर्धा शहरात साधारणपणे मे महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. यामुळे शहरात आजच्या घडीला 35 च्या घरात कन्टेन्मेंट झोन आहेत. या प्रत्येक झोनमध्ये पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी हे 24 तास कार्यरत असतात. त्यांना राहण्यासाठी इथे मंडप थाटण्यात आले आहे. आतापर्यंत या मंडपांसाठी विनापरवांगी विद्युत पुरवठा घेण्यात आला. तसेच, कन्टेन्मेंट झोन तयार करण्याची जबाबदारी ही नगर परिषद नियुक्त कंत्राटदाराला देण्यात आली असून हे शासकीय काम असल्याने आतापर्यंत कोणीही विचारले नाही. तसेच विद्युत विभागाला देखील याबाबत लक्षात आले नाही की, विद्युत पुरवठा विना परवानगी घेण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागालाही आदेश देण्याची गरज पडली नाही.
मात्र, आज मालगुजारीपुरा येथील कन्टेन्मेंट झोनमध्ये खुद्द अधीक्षक अभियंता यांना विजेची चोरी होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कन्टेन्मेंट झोनमधील मंडपाचा विद्युत पुरवठा कट केला. या घटनेमुळे प्रशासनाला झटकाच बसला. एवढेच काय जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबद्दल माहिती नसल्याचे समोर आले. पण लाईन कट केल्याने मंडपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. त्यांना गर्मीत कर्तव्य पार पाडावे लागले. त्यानंतर सदर प्रकरणी थातूरमातूर 120 रुपयाचा दंड देण्यात आल्याची माहिती वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली.
दरम्यान, आज वीज वितरणने प्रशासनाला दिलेले झटका पाहता आपण वेगळे असल्याची ओळख करून दिली. पण आजच ही ओळख का झाली यासाठी वेग वेगळी चर्चा ऐकायला मिळाली. यात असेही सांगितले जात आहे की, अधीक्षक अभियंता यांना कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर जाऊ न दिल्याने ते दुखावले गेले आणि त्यांनी प्रशासनाला झटका दिला. मात्र, याबाबत कोणी कॅमेऱ्यासमोर बोलले नाही. तर, कारवाई ही विना परवाना विद्युत पुरवठा घेतल्याने करावी लागल्याचे सांगण्यात आले.