लंडन - राजस्थानमधील मंदिरातून चोरून ब्रिटनमध्ये तस्करी करण्यात आलेली भगवान शिव यांची प्राचीन आणि अमूल्य मूर्ती भारताला परत केली जाणार आहे. राजस्थानच्या 9 व्या शतकाच्या उत्तरार्धात 'प्रतिहार' शैलीत तयार केलेली 4 फूट उंचीची ही मूर्ती 1998 मध्ये राजस्थानच्या बरोली येथील गेटेश्वर मंदिरातून चोरीस गेल्याचे सांगण्यात येते. ही मूर्ती युनायटेड किंगडममध्ये आणली गेली असून येथील एका श्रीमंत खासगी संग्राहकाच्या संग्रहात ती आढळून आल्याची बाब समोर आली होती.
ब्रिटीश आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनंतर ही मूर्ती या संग्राहकाने स्वेच्छेने 2005 मध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे सुपूर्द केली. तेव्हापासून जातमाकुता आणि त्रिनेत्रासह 'चतुर' मुद्रेतील ही शिवमूर्ती लंडनच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक आणि भव्य इंडिया हाऊसमध्ये मोठ्या डौलाने उभी आहे. 2017 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागातील अधिकाऱ्यांना या शिवमूर्तीविषयी तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यांनी ही मूर्ती बरोली येथील मंदिरातून चोरीला गेलेली शिवमूर्तीच असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. ही मूर्ती आता राजस्थानमधील मूळ घरी परत येणार आहे.
याआधीही ब्रिटन, यूएसए, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनीतील सरकारांच्या सहकार्याने भारत सरकारने प्रसिद्ध ब्रह्मा-ब्रह्माणी शिल्प 2017 मध्ये एएसआयकडे परत आणले होते. 2019 मध्ये 12 व्या शतकातील भगवान बुद्धांचा कांस्य पुतळा लंडनहून परत आणण्यात आला होता. तो अर्थमंत्र्यांनी सांस्कृतिक राज्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता. याशिवाय, 17 व्या शतकातील नवनीत कृष्णाची कांस्य मूर्ती आणि द्वितीय शतकातील चुनखडीचे कोरीव स्तंभ मोतीफ या आणखी दोन पुरातन वस्तू अमेरिकेच्या दूतावासाने 1 ऑगस्ट, 2019 उच्चायुक्तांकडे परत केले.