नवी मुंबई - परप्रांतीय मजुरांना घेऊ श्रमिक विशेष रेल्वे पनवेलमधून मध्यप्रदेशकडे रवाना झाली आहे. संचारबंदीमध्ये नवी मुंबई, पनवेल येथे अडकलेल्या मध्यप्रदेशच्या बाराशे व्यक्तींना रायगड जिल्हा प्रशासनाने निरोप दिला आहे.
टाळेबंदीमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल येथे अनेक परप्रांतीय मजूर अडकले आहेत. त्यापैकी मध्यप्रदेश राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजुरांना घेऊन विशेष रेल्वेने मध्यप्रदेशमधील रेवा येथे पाठविण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मध्यप्रदेशातील काही मजूर विविध जिल्ह्यात रायगड जिल्हा व नवी मुंबई परिसरात अडकले होते. रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे.
या सर्वांना नवी मुंबई, पनवेल येथील विविध भागामधून पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत बसने आणण्याची व्यवस्था विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केली तर मध्यप्रदेश शासनाने या मजूर व व्यक्तींचा रेल्वेने जाण्याचा सर्व खर्चाची जबाबदारी स्विकारली. रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांना जेवणाचे डबेही देण्यात आले आहेत. सामाजिक अंतराचा काटेकोर पालन करत अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने या प्रवाशांना रेल्वेत सुखरुप बसविण्यात आले आहे.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यात पोलिसांची जोरदार कारवाई; कोट्यवधींचा दंड केला वसूल