नॉटिंघम - इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यांत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांत ३०० पेक्षा अधिक धावा काढूनही पाकिस्तानचा पराभव झाल्याने पाकच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले जात आहे. याच चौथ्या सामन्यात सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक हिट विकेट होऊन बाद झाला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.
शोएब मलिक हा दुसऱ्यांदा हिट विकेट झाला. या सामन्यात शोएब ४१ धावा काढून मार्कवुडच्या गोलंदाजीवर बाद झाला. हिटविकेट होणारा तो पाकिस्तानचा सहावा फलंदाज ठरला तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये हिटविकेट होणारा आठवा फलंदाज आहे.
मार्क वुडच्या षटकात मलिक बॅकफूट वर येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला. स्क्वेअर कट मारण्याच्या नादात त्याने त्याची बॅट यष्ट्यावर मारली. शोएब क्लीन बोल्ड झाला आहे असे सुरुवातीला साऱ्यांनाच वाटत होते. रिप्लेमध्ये पाहिल्यावर तो हिटविकेट झाल्याचे दिसून आले.
शोएब हिट विकेट झाल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका युजरने शोएब टेनिस खेळत आहेस का? असे खोचक ट्वीट केले आहे. यापूर्वी तो १६ वर्षांपूर्वी १८ मे २००३ साली मुथय्या मुरलीधरनच्या चेंडूवर हिटविकेट होऊन बाद झाला.