अकोला- गेल्या 5 वर्षांपासून डंपिंग ग्राउंडवर किती ट्रॅक्टर, पोकलँड सुरू आहेत. त्यांच्यावर आपण किती खर्च करीत आहोत. तसेच दीड वर्षांपासून गहाळ झालेल्या फाईलीबाबत पोलिसांकडे तक्रार देऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई का केली नाही, यासह आदी बाबींवर शिवसेना गटनेते यांनी आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रश्न उपस्थित केले. परंतु, त्याबाबत योग्य उत्तर न मिळाल्याने त्यांनी गदारोळ केला.
महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सतीश ढगे यांच्या आदेशाने सभेला सुरुवात झाली. स्वछता अभियान अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या निविदेस मान्यता देण्याकरिता सर्व सदस्यांनी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा यांनी महापालिका डंपिंग ग्राऊंडवर किती खर्च करीत आहे, त्या ठिकाणी किती पोकलँड सुरू आहेत, त्यांना किती भाडे महापालिका देत आहे, असे प्रश्न उपस्थित केले. सभापती ढगे यांच्या समक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपा फक्त भाडेच देत असल्याचे नगरसेवक मिश्रा यांनी म्हटले आहे. हे साहित्य विकत घेतल्यास आपल्याला भाड्यापेक्षा मशीन खरेदी करणे परवडले असते. त्यामुळे मनपा प्रशासनाने भाड्याच्या नावाने सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करून मशीन विकत घेण्याची मागणी त्यांनी केली.
त्यांच्या या सूचनेवरून सभेत नवीन मशीन खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. या विषयानंतर राजेश मिश्रा यांनी महापालिकेच्या नगर रचना विभागातून एक दीड वर्षांपासून अकृषक जमीन करण्यासाठी दिलेली फाईल गहाळ झाली आहे. ही फाइल कोणी हरविली, कोणी नेली, याबाबत कोणाकडे उत्तर नसल्याने मनपा नगररचना विभागाने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु, मनपाच्या कार्यालयातून फाइल हरविली आहे. ती फाइल पोलीस कसे शोधतील, हे तुम्ही दिलेल्या तक्रारीत स्पष्ट नसल्याने ही तक्रार पोलीस दप्तरी चौकशीत आहे. त्यामुळे मनपा अधिकारी व सत्ताधारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला.
यासंदर्भात संबंधित विभागाने फाइलबाबत माहिती द्यावी, तसेच ज्या कर्मचाऱ्यांकडून ही फाइल हरविली आहे, त्यावर जबाबदारी निश्चित करून त्यास निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. परंतु, यावर सभापती यांच्यांकडून प्रकरण सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी सभापती ढगे यांनी अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास सांगितल्यानंतर सभा संपविण्यात आली.