मुंबई - भारत आणि चीनमध्ये झालेल्या झटापटीमध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाल्यानंतर आज (शुक्रवारी) शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चीनने केलेला हल्ला हा देशाच्या सार्वभौम आणि एकात्मतेवरच हल्ला आहे. तसेच मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. 20 जवानांना हाल हाल करून मारले हे डिवचणे नाही तर काय? असा सवालही शिवसेने उपस्थित केला आहे. पंडित नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल, असा टोलाही शिवसेनेने केंद्र सरकारला लगावला आहे.
सामना अग्रलेखात म्हटले आहे की, चिनी सैन्याने केलेला हल्ला हा 1962 इतकाच भयंकर आणि घातकी आहे. चीनला सडेतोड उत्तर देण्याची भाषा तेव्हाही झाली व आजही सुरू आहे. पण आपण फक्त पाकड्यांनाच धमकावू शकतो. चीनला अंगावर घेण्यास आपण असमर्थ आहोत. या भ्रमातून देशाला कसे बाहेर काढणार? ज्या ट्रम्प यांच्यासाठी मोदी यांनी चीनशी पंगा घेतला आहे. ते ट्रम्प म्हणे व्हाईट हाऊसमध्ये बसून हिंदुस्थान-चीन तणावावर लक्ष ठेवून आहेत. त्याने काय होणार? पाकिस्तानबरोबरचे युद्ध 1971 साली झाले व अमेरिका पाकिस्तानला मदत करण्याचे चित्र समोर आले. तेव्हा रशियाने त्यांचे सातवे आरमार इंदिरा गांधींच्या मदतीसाठी पाठवले. त्याबरोबर अमेरिकेने माघार घेतली. ट्रंम्प त्यांचे मित्र मोदी यांच्या मदतीसाठी अशी काही ताकद पाठवणार आहेत काय? असा सवालही अग्रलेखात उपस्थित केला आहे.
1962 च्या युद्धाचा उल्लेख करताना अग्रलेखात म्हटले आही की, नेहरूंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूट, शस्त्र गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले. ही चीनबरोबरची लढाई आपली आपल्यालाच लढावी लागेल व त्यादृष्टीने तयारी करावी लागेल. चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी वगैरे ठीक आहे. हवाई दलही तैनात केले. रणगाडे नेऊन ठेवले हे सर्व तर जागेवर राहीलच, पण चीनची आर्थिक कोंडी करणे तर काही प्रमाणात नक्कीच शक्य आहे. चीनकडून आपल्या देशात येणाऱ्या हजारो वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. पण ही स्वदेशी जागृती दाखवायची जनतेने. मात्र, ज्या अनेक चिनी कंपन्या हिंदुस्थानात पसरल्या आहेत त्यांचे काय करणार आहात? असा प्रश्न शिवसेनेन केंद्र सरकारला केला आहे.
भारत-अमेरिका मैत्री झाली म्हणून चीन मागे हटेल?
चीन हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा शेजारी आहे हे विसरता येणार नाही. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेसारखे शेजारी हिंदुस्थानला जुमानत नाहीत. तेथे हिंदुस्थान-अमेरिकेची मैत्री सुरू झाली म्हणून, चीनसारखे राष्ट्र मागे हटेल असे होणार नाही. मोदी हे पंतप्रधान झाल्यावर जगभरात गेले. पण रशिया किंवा इस्राएलसारख्या राष्ट्रांनीही चीनबरोबरच्या संघर्षात हिंदुस्थानची बाजू घेतली नाही. तुमचे आपसातले भांडण तुम्ही मिटवा हाच त्यांचा संदेश आहे. कोणत्याही राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण त्याच्या शेजारी राष्ट्रांसंबंधीच्या धोरणावरच निश्चित होत असते. चीन आणि पाकिस्तान यांच्या धोरणांची दखल घेऊन आपल्याला विदेश धोरणाची दिशा निश्चित केली पाहिजे. कारण हिंदुस्तान विरोध या समान भूमिकेवरून ही दोन राष्ट्र एक झाली आहेत. त्यामुळे या राष्ट्रांपैकी कोणत्याही एका राष्ट्राशी संघर्ष निर्माण झाला तर आपल्याला त्या दोघांविरुद्ध लढावे लागणार आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. असा सामनाच्या अग्रलेखात उल्लेख केला आहे.