अहमदनगर - गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुः ख देणारी असून सवंग प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही आता 'फॅशन' झाली आहे. शरद पवार हे एक देशव्यापी नेतृत्व असून त्यांच्यावरची टीका ही दुर्दैवी असल्याची भावना राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी व्यक्त केली आहे.
आज अकोले तालुक्यातील राजूर येथील आपल्या निवासस्थानी पिचड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, की मी भाजपात जरी गेलो असलो तरी शरद पवार यांना आपण जवळून पहिले आहे. त्यांचे सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे योगदान नाकारून चालणार नाही. ते एक देशव्यापी नेतृत्व असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या नंतर शरद पवार यांचे नेतृत्व सर्व जातीधर्मांना, सर्वांना बरोबर घेऊन राजकारण समाजकारण करणारे राहिले. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसांनी टीका करणे योग्य नाही. हे निषेधार्थ आहे, असे पिचड यांनी व्यक्त केले.
मी राजकारणातून निवृत्त झालो असलो तरी अशा घटनांनी मन व्यथीत होते. गेल्या 40 वर्षांचा अनुभव आणि वय वर्षे 80 आहे, यामध्ये आपण शरद पवारांबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका बऱ्याचदा झाली असेल पण ते निश्चल आहेत. अशा प्रकारच्या टीकांनी ते कधीच अस्थिर झाले नाहीत. देशाच्या राजकारणात त्यांचे अनन्य साधारण असे महत्त्व असून टीका करणाऱ्यांनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे व त्यांचे देशासाठी व राज्यातील योगदानाची उंची पाहून बोलले तर बरे होईल, असे पिचड म्हणाले.
त्याचबरोबर, छोट्या कार्यकर्त्यांना माझ्या नेहमी सूचना असतात. मोठ्या माणसांवर बोलताना आपली कुवत पाहून मर्यादा पाळाव्यात, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.