लाहोर - पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने ३७ चेंडूत विक्रमी अविस्मरणीय शतक ठोकले होते. आफ्रिदीने या विक्रमावर त्याने १८ वर्ष सत्ता गाजविली. त्याचे हे शतक भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या बॅटने ठोकल्याचा आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रातून सांगितले आहे. न्यूझीलंडच्या कोरी अॅडरसनने २०१४ साली हा विक्रम मोडीत काढला.
आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले की, सचिनची बॅट पाकिस्तनाचा खेळाडू वकार युनिस याच्याकडे दिली होती. सियालकोट येथे चांगल्या बॅट तयार करून मिळतात, त्यामुळे सचिनला त्याच्या त्या बॅटसारखीच बॅट तयार करून हवी होती. त्यामुळे सचिनने ती बॅट वकारला दिली होती. पण ती बॅट सियालकोटला नेण्याआधी वकारणे ती बॅट मला दिली आणि त्या बॅटने स्फोटक खेळी करत ३७ चेंडूत शतक ठोकले.
आफ्रिदीने १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना हे विक्रमी शतक ठोकले. या खेळीत त्याने ११ षटकार आणि ६ चौकार लगावले होते. त्याने सामन्यात ४० चेंडूत १०२ धावांची खेळी केली होती.
आफ्रिदीने त्या सामन्याबाबत आणखी एक किस्सा सांगितला आहे. त्या सामन्याच्या आधी आफ्रिदीला एक स्वप्न पडले होते, की लंकेच्या गोलंदाजावर मोठ मोठे षटकार ठोकत आहे. आफ्रिदीने हे स्वप्न त्याचा रुममेट शादाब कबीर याला सांगतिले. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आफ्रिदी प्रार्थनाही करत होता. काही तासानंतर आफ्रिदीचे हे स्वप्न खरेही ठरले. सनथ जयसूर्याने ९४ धावा देत ३ गडी बाद केले तर मुरलीधरनने ७३ धावा देत २ गडी बाद केले .