सातारा : बुधवार नाका परिसरात मटका अड्ड्यावर कारवाई करत सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नगरसेविका पुत्र अमर आवळेसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बुधवार नाका परिसरातील वॉशिंग सेंटर जवळ ही कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी अमर आवळे याच्या घराजवळ, पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका चालू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली होती. त्यांनी शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करून छापा टाकला. त्या ठिकाणी काही व्यक्ती कल्याण नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे दिसून आले. हा मटकाअड्डा नगरसेविका पुत्र, मटका व्यावसायिक अमर आवळे व त्याचा जोडीदार किरण अनिल कुऱ्हाडे (रा. करंजे) या दोघांचा होता. छाप्यादरम्यान घटनास्थळी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोटारसायकल, मोबाईल, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अमर आवळे (रा. बुधवारनाका), किरण अनिल कुऱ्हाडे (रा. एकता कॉलनी, करंजे), प्रविण ऊर्फ गोट्या दत्तात्रय जगताप (वय २७, रा. १४५ प्रतापगंजपेठ), जतिन संजय वाघमारे (वय २७, रा. २६६ बुधवारपेठ), संजय तानाजी भिसे (वय २९, रा. शाहुनगर बेघरवस्ती कोरेगाव), वासुदेव शिवाजी जांभळे (वय ३०) व रोशन चंदकांत जगताप (वय २२, दोन्ही रा. दुघी ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या सात जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.