जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. ब. गो. शानभाग विद्यालयाची समीक्षा विजय लुल्हे ही विद्यार्थिनी ९९.८० टक्के गुण मिळवून जळगावातून अव्वल ठरली आहे. तसेच नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयातील माहेश्वरी दीपक नारखेडे हिने ९९.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
कै. ब. गो. शानभाग विद्यालयाने यावर्षीदेखील दहावीच्या निकालात आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शानभाग विद्यालयाचे विद्यार्थी अव्वलस्थान पटकावत आहेत. यावर्षी तर शानभाग विद्यालयाने 'हॅट्ट्रीक' साधली आहे. २०१८ मध्ये विशाखा कुलकर्णी या विद्यार्थिनीने जळगावात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर २०१९ मध्ये प्रज्ज्वल पाटील याने तर आता समीक्षा लुल्हे हिने ९९.८० टक्के मिळवून अव्वलस्थान मिळवले आहे. समीक्षाने घवघवीत यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आजोबा सुपडू लुल्हे, आजी सिंधू लुल्हे तसेच वडील विजय व मोठी बहीण सुवर्णा यांनी पेढा भरवून तिचे कौतुक करत घरीच आनंदोत्सव साजरा केला.
दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या समीक्षाला वाणिज्य क्षेत्रात करिअर करायचे असून, सीए व्हायची तिची इच्छा आहे. त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी असल्याचे तिने सांगितले. वाणिज्य क्षेत्राविषयी लहानपणापासून आकर्षण असल्याने तिचे गणित विषयावर अधिक लक्ष असते. म्हणूनच प्रत्येक वर्षी शाळेसोबत अबॅकसचे क्लासेस देखील ती लावत असते. दहावीची परीक्षा ही बोर्डाची परीक्षा असते, खूप मेहनत घ्यावी लागते, अशा प्रकारचा कोणताही बाऊ न करता, मनावर ताण न घेता मी परीक्षेला सामोरे गेले. घोकंपट्टी करण्यापेक्षा नेमका अभ्यासक्रम समजून घेऊन मेहनत घेतली. विशेष म्हणजे, मला खेळायची आवड आहे. खेळांमुळे एकाग्रता टिकवणे मला सोपे गेले. परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. त्यामुळेच मला यश मिळाले, असे गमक समीक्षाने सांगितले.
यशाचे श्रेय आई-वडिलांना-
दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाचे श्रेय ती आई-वडिलांसह शिक्षकांना देते. आई-वडिलांनी कोणत्याही गोष्टींची उणीव भासू दिली नाही. त्यांनी वेळोवेळी पाठबळ दिल्यानेच मला चांगला अभ्यास करता आला. शिवाय शिक्षकांनी योग्य आणि मोलाचे मार्गदर्शन केल्याने अभ्यास सोपा वाटू लागला. शिक्षकांनी दिलेल्या टिप्समुळेच परीक्षेत यश मिळवता आले. म्हणून मी माझे यश आई-वडिलांसह शिक्षकांना समर्पित करते, असे समीक्षा हिने सांगितले.
कोरोनामुळे मोबाईलवरूनच दिल्या एकमेकांना शुभेच्छा-
दहावी शालांत परिक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ९३.५१ टक्के लागला आहे. दरम्यान, निकाल बुधवारी दुपारी जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्गात प्रचंड उत्सुकता होती. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी मोबाईल, लॅपटॉप तसेच संगणकावर आपला निकाला पाहिला. आपण उत्तीर्ण झाल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी घरातच पालकांसोबत आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच पालकांनी बाहेर पडणे टाळल्याचे पाहायला मिळाले. निकालानंतर आपल्या शाळेत जाऊन शिक्षकांचे आशीर्वाद घेण्यासही विद्यार्थी कोरोनामुळे बाहेर गेले नाहीत. दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना मोबाईलवर संपर्क साधून एकमेकांचा निकाला जाणून घेतला. एकमेकांना शुभेच्छाही मोबाईलवरूनच देण्यात आल्या. अनेक पालकांनी घरीच आपल्या मुलांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला.