जळगाव - अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम शासनाने आखला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येत्या १ जुलैपासून या उपक्रमास सुरुवात हाेणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ ते ७ जुलैदरम्यान कृषी संजीवनी सप्ताह राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिली.
या सप्ताहात कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकानिहाय नियोजन करणे, उपक्रमात अधिकाधिक कृषी तज्ज्ञांचा सहभाग वाढवला जाणार आहे. सप्ताहात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश देण्यात आले आहे. अनेक शेतकरी बांधवांकडून कृषी विषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात, अशा उपक्रमांना कृषी संजीवन सप्ताहात भेटी द्याव्यात त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. एम. किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहिम यशस्वीपणे राबवण्यात यावी.
शेतकऱ्यांचा हाेणार गाैरव
प्रयोगशील शेतकरी व उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांचे व्याख्याही विविध माध्यमांचा वापर करून आयोजित करण्याचेही नियोजन कृषी विभागाकडून केले जात असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.