मुंबई- सरकारमध्ये असतानाही काँग्रेस मंत्र्यांना निर्णय प्रक्रियेत डावलेले जात आहे, त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दादर येथे भेट घेतली.
या भेटीत काँग्रेसकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांपुढे नाराजीचा पाढा वाचण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. तर ही भेट नियमित होती, या भेटीत राज्यातील विविध प्रकारच्या कामकाजांच्या संदर्भात थोरात यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचेही सांगण्यात आले.
काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारकडून महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत डावलेले जात असल्याने मागील अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मागील महिन्यात थोरात यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही फार काही फरक पडला नसल्याने आज पुन्हा एकदा थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात कोरोनाचे वाढते संकट असतानाही राज्यात महसूल विभागाचा कारभार सुरळीत सुरू आहे. मात्र विविध शहरांमध्ये नव्याने लादण्यात आलेल्या लॉकडाऊनचा महसूल विभागाच्या अनेक जिल्ह्यातील कामकाजाला मोठा फटका बसत असून त्यासाठी काही वेगळी सूट देण्याची मागणी यावेळी महसूलमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगण्यात येते.