सातारा - फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे एका पेट्रोल पंपामागे मोकळ्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर फलटण शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे.
सर्व संशयित फलटण तालुक्यातील -
पोलिसांनी सांगितले की, फलटण तालुक्यातील झिरपवाडी गावच्या हद्दीत नीळकंठ पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी काहीजण तेथे जुगार खेळत होते. याप्रकरणी पोलिसांनी फलटण तालुक्यातील चंद्रकांत जाडकर (रा. निरगुडी), निलेश लक्ष्मण कदम (रा. गिरवी), नितीन मोहन गायकवाड (रा. तरडगाव), माऊली भिवरकर (रा. धूळदेव), विशाल पवार (रा. सोमवार पेठ), सचिन गुंजवटे (रा. झिरपवाडी) व कुणाल लालासाहेब भंडलकर (रा. उमाजी नाईक चौक) या सात जणांवर गुन्हा दाखल केला.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ६१ हजार ७५० रुपयांचे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि तीन मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. या सर्वांना फलटण शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे.