जालना- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी व्यवसाय करताना सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे आदेश दिले होते. मात्र बदनापुरात दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नव्हते. त्यामुळे नियमांना बगल देणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने गर्दी आढळून आल्याने बाजार गल्लीतील 2 दुकानांवर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही दुकान मालकांवर थेट गुन्हे नोंदविले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी प्रतिबंधात्मक आदेशानुसार, व्यवसाय करत असलेल्या दुकानात लोकांची गर्दी होऊ न देता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच व्यवसाय चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र व्यावसायिक या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते.
दरम्यान, बदनापूरचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, खंडागळे व चरणसिंग बमनावत हे वाहनाने बदनापूर शहरात गस्त घालत होते. त्यावेळी जुन्या बाजारगल्ली येथील तापडिया पेंट्स अँड हार्डवेयर व खत आणि बी-बियाण्यांची विक्री करणाऱ्या मानकचंद कटारिया या दुकानामध्ये लोकांची गर्दी आढळून आली. त्यामुळे जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाचे भंग करणे, आपत्ती निवारण कायदा लागू असताना सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी जमवून दुकानातून सामान विक्री करणे, याबाबत पोलीस कर्मचारी चरणसिंग बमनावत यांच्या फिर्यादीवरून कलम 188, 269, 34 अन्वये व राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार दोन्हीं दुकानमालकांविरुद्ध गुन्हा नोंदविन्यात आला आहे.
बदनापूर येथील 2 बड्या दुकान मालकांवर थेट गुन्हे नोंद झाल्यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व दुकानदारांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच आपापला व्यवसाय करावा. तसेच आपत्ती निवारण कायद्यानुसार आपल्या दुकानांसमोर गर्दी होऊ देऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे सांगून या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक खेडकर म्हणाले.