मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केले जातात. प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या आणि रुग्णालयांना यासाठी रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा त्या रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर प्रायोगित तत्वाव नि: शुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे. केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरेपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पद्धतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (ऑफ लेबल) वापरण्यासाठी खासगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले होते.
रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी या प्लाझ्माचा प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या/विशेष चाचण्या यासाठी आकरण्यात येणाऱ्या सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे.
त्यानुसार प्लाझ्मा बॅग (२०० मिली) ५ हजार ५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर १२०० रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमिल्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर ५०० रुपये (प्लाझ्मा बॅग किंमती व्यतिरिक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.