बीड - राजकीय हेवेदावे विसरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. इतरवेळी राजकारणात राजकीय व्यासपीठावरून एक दुसऱ्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे बीडचे मुंडे बहिण-भाऊ संकटकाळी एक दुसऱ्याची काळजी घेतात याचा प्रत्यय शुक्रवारी आला. बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजताच त्यांच्या बहिण पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत काळजी घेण्याबाबत सांगितले.
सध्या मंत्री धनंजय मुंडे मुंबईत एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राजकारणातील हेवेदावे बाजूला ठेवून बहिण पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची विचारपूस केल्याने याची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे. सहा सात महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावामधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. एक दुसऱ्यावर टोकाची टीका दोघांनीही केली होती. मात्र, शुक्रवारी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पंकजा यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले.
पंकजा मुंडे यांच्या या अनपेक्षित कृतीची बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होत आहे. मागील सहा महिन्यापूर्वी दोघेही बहिण-भाऊ परळी विधानसभा मतदारसंघात एक दुसऱ्याचे राजकीय विरोधक म्हणून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकावर झाडत होते. आता संकटकाळी हेवेदावे विसरून स्वतः पंकजा यांनी त्यांचे भाऊ धनंजय यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी देखील यातून बोध घेण्यासारखे असल्याचेही बोलले जात आहे. येत्या आठवडाभरात धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक होईल, असेही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.