भंडारा- जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर एक दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे. नागेश मधुकर भाजीपाले (वय. 30 रा. लाखनी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून असद असलम आकबानी (वय. 20) हा गंभीर जखमी झाला आहे.
नागेश भाजीपाले व असद आकबानी हे स्पोर्ट दुचाकी (क्र. एमएच.31 एएक्स 5668) ने लाखणीकडून साकोलीकडे भरधाव वेगाने जात होते. गाडी समोर अचानक काहीतरी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबले, त्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की यात नागेश याचा जागीच मृत्यू झाला, तर असद अकबानी याला गंभीर अवस्थेत नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
मृत नागेश हा लाखनी येथील मोठ्या भाजी विक्रेत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा आघात पोहोचला आहे. त्याचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे आणण्यात आले असून घटनेची नोंद लाखनी पोलिसानी केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर, पोलीस हवालदार सुभाष राठोड, पोलीस नायक प्रमोद टेकाम, पोलीस शिपाई मुकेश गायधने करत आहेत.