वर्धा - पुलगाव येथील एक युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. हा युवक मुंबईच्या मुलुंड परिसरातून आला असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या हायरिस्कमधील 6 आणि लो रिस्कमधील 17 जणांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.
14 जूनला दोन कारमध्ये 8 मित्र मुंबईहून आले होते. यात एका कारमध्ये चौघे प्रवास करत होते. यातील 19 वर्षीय युवक हा पुलगाव आणि इतर तिघे इंजाळा येथील रहिवासी होते. दुसऱ्या कारमधील चौघांपैकी एक वर्धा आणि इतर तिघे चंद्रपूर जिल्ह्यातील होते. यात एकाला वर्धेला सोडून ती कार चंद्रपूरला गेली. या चौघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना देवळी येथील कोरोना सेंटरला ठेवण्यात आले आहे.
यात चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरीचा युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. यामुळे देवळी येथील चौघांचे आणि वर्धा येथील एक असे 5 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील पुलगाव येथील युवकाची कोरोना चाचणी संशयित आल्याने त्याची पुन्हा टेस्ट करण्याचे ठरले. त्यात हा युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे येताच त्याच्या संपर्कात आलेल्या तिघांना वर्ध्यात विलगीकरणामध्ये हलवण्यात आले आहे.
तसेच युवकाचे वडील, मित्र आणि कुटुंबातील काहींना अलगीकरणात आणि इतर 17 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात उर्वरित लोकांचे स्वॅब घेतले जाईल, त्या अहवालाची प्रतिक्षा असली तरी सध्या या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.