मुंबई - क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान गोलंदाजांचा विषय जेव्हा निघतो, तेव्हा पाकिस्तानच्या गोलंदाजांची नावे नक्कीच समोर येतात. पाकिस्तान म्हणजे वेगवान गोलंदाजाची जणू खाणच आहे. त्यापैकी शोएब अख्तर हा असा गोलंदाज आहे, ज्याची सतत आठवण काढली जाईल. अख्तरने १७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सर्वात वेगाने चेंडू फेकला होता.
भल्या भल्या फलंदाजांच्या मनात धडकी भरविणाऱ्या अख्तरने लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना क्रेंग मॅकमिलन याला १६१ किलोमीटर प्रतितासच्या वेगाने चेंडू फेकला होता. त्यानंतर अख्तरने त्याचा हा विक्रम २००३ साली झालेल्या विश्वचषकात मोडीत काढला.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे इंग्लंडचा फलंदाज नीक नाईट याला १६१.०३ किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू फेकून सर्वात वेगाने चेंडू फेकण्याचा इतिहास घडविला. अख्तरने या षटकात १५३.३km/h, १५८.४km/h, १५८.५km/h, १५७.४km/h, १५९.५km/h, १६१.३km/h च्या स्पीडने हा चेंडू टाकले होते.
शोएबने आंतराराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असून सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने पाकिस्तानकडून १४ वर्ष क्रिकेटचे प्रतिनिधीत्व केले. यात त्याने १६३ एकदिवसीय सामन्यात २४७ गडी बाद केले आहेत. तसेच ६३ कसोटी सामन्यात त्याने १७८ बळींची नोंद त्याच्या नावावर आहे.