सेऊल - अमेरिकेसोबत चर्चा करण्याची गरज नाही, असे उत्तर कोरियातील मंत्र्याने वक्तव्य केले आहे. कोरियन द्विपकल्पातून आण्विक शस्त्रे हद्दपार करण्यासाठी याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम- जोंग-उन यांच्यात तीनवेळा चर्चा झाली आहे. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र, आताच्या कठीण परिस्थितीत पुन्हा चर्चेची गरज नसल्याचे मत उत्तर कोरियाने व्यक्त केले आहे.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूका होणार आहेत. त्याआधी ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यातील चर्चेसाठी एक परिषद आयोजित केली जावी, यासाठी दक्षिण कोरिया जोर देत आहे. यावर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्र मंत्री चौ-सन-हुई यांनी मत नोंदविले.
अणुप्रश्नाबाबत उत्तर कोरियाबरोबर वाटाघाटी करुन हा प्रश्न सुटले, असे जर अमेरिकेला वाटत असेल तर ती त्यांची चुक आहे. अमेरिकेपासून असलेल्या धोक्यांवर रणनीती आखण्यास उत्तर कोरियाने तयारी चालू केल्याचे हुई यांनी सांगितले.
अमेरिकेबरोबर चर्चा करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. अमेरिकेतील राजकीय गोंधळाच्या परिस्थितीत दोन्ही देशातील चर्चेचा मुद्दा फायद्यासाठी वापरला जात आहे, असे हुई म्हणाले. उत्तर कोरियाने आण्विक कार्यक्रम बंद केल्यास त्यांना अमेरिकेकडून काही सवलती मिळतील, यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात 2018 नंतर तीनवेळा चर्चा झाली आहे. मात्र, काहीही तोडगा निघालेला नाही.