सिओल (दक्षिण कोरिया)- घन इंधनावरून उत्तर कोरियाच्या वृत्तपत्रांनी दक्षिण कोरियाला लक्ष्य केले आहे. नुकतेच अमेरिकेने दक्षिण कोरियाला अंतरिक्ष यानासाठी घन इंधन वापरण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा निर्णय दक्षिण कोरियाच्या शांती स्थापनेच्या निर्णयाच्या विपरित असल्याचे वृत्तपत्रांचे म्हणणे आहे.
दक्षिण कोरियाला घनरूप इंधनाचा वापर करता यावा यासाठी 28 जुलैला अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी त्यांच्यामधील क्षेपणास्त्र मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेतला होता. यामुळे दक्षिण कोरियाला भविष्यात उत्तर कोरियावर नजर राखण्यासाठी अवकाशात सॅटेलाईट आणि अंतरिक्ष यान सोडता येणार आहे, असे वृत्तपत्रांचे म्हणणे आहे.
मिअरी, या उत्तर कोरियन वेबसाईटने याबात दक्षिण कोरियाचा विरोध केला आहे. नवीन मार्गदर्शक तत्वानुसार दक्षिण कोरियाला घन इंधनाच्या सहायाने उडणाऱ्या अंतरिक्ष याणाच्या माध्यमातून अवकाशात हेरगिरी करणारे सॅटेलाईट सोडता येणार, असे सांगत वृत्तपत्राने आपला विरोध दर्शविला आहे. मिअरी प्रमाणे उरिमिन्झोकिरी या टीव्ही माध्यमाने देखील क्षेपणास्त्र मार्गदर्शक तत्वात केलेल्या बदलांचा विरोध केला आहे.
मात्र याप्रकरणी उत्तर कोरियाचे अधिकृत वृत्त माध्यम कोरियन सेंट्रल एजन्सी आणि रोडोंग सिनमून यांनी मौन बाळगले आहे.