अहमदनगर- राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निमगाव कोऱ्हाळे येथील अणाभाऊ साठै नगर, क्रांती चौक, वेसजवळील गावठाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळील वस्ती, एकलव्य नगर, इंदिरा वसाहत, कातोरी वस्ती, साईनाथ हाऊसिंग सोसायटी, चांगदेव नगर, सुलाखेनगर, यमुनानगर, विजयानगर, देशमुख चारीखालील भाग, रेस्ट हाऊस हेलीपॅड रोडपासून उत्तर बाजू कंटेनमेंट क्षेत्र आणि निघोज गावठाण बफर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी 30 मे दुपारी 2 वाजल्यापासून वाजेपासून दिनांक 12 जून रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
कंटेंनमेंट झोनचे पालन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांना माहिती द्यावी. याभागात नियंत्रण कक्ष स्थापन करावा, नागरीकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तु सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तुंचे विक्रेते निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतूक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकिंग सुविधा बॅंक प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना देण्यात येणार आहेत.
पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता खुला ठेवावा. सदर क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत.या भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्यात आली आहे. सदर क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.