परभणी - शहरातील सरफराज नगरमध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. रात्री उशिरा आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली. यासह आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 92 झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेतच तपासलेल्या पाचपैकी या एका नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, नांदेड येथे प्रलंबित असलेल्या 29 पैकी एकाही रुग्णांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. तसेच, iगुरूवारी तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याने उर्वरित 12 जणांवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. 9 जून रोजी 2 रुग्ण आढळले होते. मात्र, त्यापूर्वीचे पाच दिवस एकही रुग्ण आढळून आला नव्हता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा रात्री उशिरा शहरातील सर्फराज नगरमध्ये 28 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण 3 जूनला मुंबई येथून त्याच्या कळमनुरी येथील दोन मित्रांसोबत परतला आहे. त्याच्यासोबत गाडीचा चालकही होता. गुरूवारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल होताच त्याचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता.
दरम्यान, या रुग्णाने 3 ते 9 जून दरम्यान परभणी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर तो सर्फराज नगरातील त्याच्या घरी गेला होता. तर संध्याकाळी मित्रांसोबत चहा पिण्यासाठी घराबाहेर पडल्याचीही माहिती मिळाली आहे. शिवाय, कळमनुरी येथे गेलेल्या त्याच्या दोन मित्रांनाही कोरोना लागण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा आता आरोग्य प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. त्यानुसार, रात्री उशिरा त्याच्या संपर्कात आलेले त्याची आई, बहीण आणि भाऊजी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
या रुग्णासह परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 92 एवढी झाली आहे. त्यापैकी 77 रुग्णांना आतापर्यंत सुट्टी देण्यात आली असून, 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 12 रुग्णांवर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आता अहवाल झटपट मिळण्याची शक्यता
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच शहरातील सिसोदिया लॅबच्या सहकार्याने कोरोना स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मात्र, मागच्या महिन्यात दोन वेळेस तपासण्या झाल्यानंतर यंत्रामध्ये बिघाड झाली. ज्यामुळे ही प्रयोगशाळा बंद पडली होती. परंतु, आजपासून पुन्हा ती सुरू झाली असून आता जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या तपासण्या लवकर होऊन झटपट अहवाल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.