काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान के. पी शर्मा ओली यांनी आज (बुधवारी) मंत्र्यांशी सल्ला मसलत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. काल (मंगळवार) सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या (एनसीपी) नेत्यांनी ओली यांचा तत्काळ राजीनामा मागितला आहे. भारताबरोबरच्या सीमा वादानंतर आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप ओली यांनी नुकताच केला आहे.
पक्षाचे वरीष्ठ नेते पुष्प कमल दहल, माधव नेपाळ, झलनाथ खनाल, भीमदेव गौतम यांनी पंतप्रधान ओली यांना राजीनामा मागितला आहे. अनेक प्रश्न हाताळताना पंतप्रधानांना अपयश आल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. हिमालयन टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीपी पक्षाने मंगळवारी बैठक बोलावली होती. यामध्ये ओलींनी भारताबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चा झाली. तसेच इतर अनेक विषय चर्चिले गेले.
पंतप्रधान ओली यांनी पक्षात दुफळी निर्माण केली तसेच फक्त स्वत:चे हितसंबध पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, असे पक्षाच्या खनाल या नेत्याने सांगितले. चांगल्या योजना राबविण्यात ओली अपयशी ठरले असून मागील तीन वर्षांपासून त्यांनी भांडवलशाही धार्जिण्या योजना लागू केल्या. सामाजवादाच्या ध्येयांकडे ओली यांनी दुर्लक्ष केल्याचे खनाल म्हणाले.
भारताला उकसावल्याप्रकरणी दहल यांनी ओलींकडे स्पष्टीकरण मागितल्याचे एका सदस्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. नेपाळने नुकतेच भारताच्या हद्दीतील लिपूलेक, लिंपियाधुरा आणि कालापाणी हे भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केले आहेत. तसेच यासंबधी घटनादुरुस्तीही केली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबध तणावाचे बनले आहेत.