मुंबई- कोरोना जगभर थैमान घालत आहे. याचा फटका सर्वांना बसला आहे. मुंबईतील लालबागमध्ये वाद्य विक्री व्यवसाय करणाऱ्यांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आले. त्यामुळे वाद्यांचा निनाद तेव्हाच थंडावला. त्यात मोठे उत्सवही रद्द झाल्याने ठेका धरायला लावणारा तालही हरपला आहे. त्यामुळे वाद्यांच्या या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
लालबागमधील वाद्य विक्रेते मेहूल चव्हाण यांना देखील कोरोना काळात व्यवसाय बंद असल्याने फटका बसला. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही पुढे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे आपली वाद्य वस्तू विकल्या जाणार नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे आधीच 3 महिने वाद्य विक्रीचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे वाद्याच्या दुकानात काम करणाऱ्या लोकांचे पगार देणे अडचणीचे झाले होते. पण माणुसकीच्या नात्याने वाद्यविक्री करणाऱ्यांनी कामगारांना पगार आणि धान्य दिले. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्व सुरळीत होईल, असे वाद्यविक्री करणाऱ्यांना वाटले. पण, गोपाळ काला गणेशोत्सव, आषाढी एकादशी यासारखे सण आता रद्द झाल्याने वाद्य विक्री होणे शक्य नाही. त्यामुळे जगायचे कसे? हा प्रश्न वाद्य विक्रेत्यांना भेडसावत आहे.
मुंबईतील लालबागमध्ये गेल्या 80 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ढोलकी, तबला, बेंजो, टाळ, असे उत्सवाला लागणाऱ्या साहित्यांची विक्री आम्ही करतो. आमचे वडील, आजोबा, पणजोबा आणि आता मी स्वतः अशा चार पिढ्या या व्यवसायावर जगत आलो. आयुष्यात पहिल्यांदाच कोरोनामुळे आमचा व्यवसाय बंद झाला आहे. त्याचा परिणाम आमच्यावर झाला आहे. आता पुढेही सण उत्सव रद्द झाल्याने आम्ही आता काय करायचे हे कळेनासे झाले आहे, असे मेहूल चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.