सातारा - साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची केंद्रीय कृषी स्थायी समितीवर निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांची निवड केली आहे. श्रीनिवास पाटील हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेती आणि शेतकर्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर शेतकर्यांचे आणि शेतीमालाचे प्रश्न ते लोकसभेत चांगल्या पद्धतीने मांडतील, अशी प्रतिक्रिया सातारा लोकसभा मतदारसंघातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
श्रीनिवास पाटील यांची यापूर्वी शेतीविषयक सल्लागार समितीवर सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली होती. तसेच त्यांची केमिकल्स अँड फर्टिलायझर कमिटीवरही नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यांचा शेतीक्षेत्रातील अभ्यास पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना शेतीविषयक स्थायी समितीवर घेतले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा अधिवेशनात श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत कांदा निर्यातबंदीसंदर्भात लोकसभेत अभ्यासपूर्ण निवेदन केले होते. त्यांनी कांदा उत्पादकांची व्यथा पोटतिडकीने मांडली होती. त्यांना शेतीविषयक सखोल ज्ञान असल्याने हे आपली निवड सार्थ ठरवतील, असा विश्वास सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना आहे.