मुंबई- मानखुर्द येथील 'चिल्ड्रन्स होम सोसायटी' येथील व्यवस्थापनाने दोन आठवड्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधून काही मुलांना खोकला असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी फिव्हर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यात 30 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. या चिल्ड्रन्स होममध्ये कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
कॅम्पमध्ये एकूण 268 मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यातील 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामधील 30 मुले ही पॉझिटिव्ह निघाली. यातील 2 मुले ज्यांना कर्करोग आहे, त्यांच्यावर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 28 मुलांना बिकेसी, बांद्रा येथील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येत आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सर्व खबरदारी घेतली जात आहे.