अकोला - तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव येथे एका निर्जन ठिकाणी शेकडो ब्रास रेती जमा करून ठेवण्यात आली असल्याची माहिती तेल्हाराचे तहसीलदार दिपक जरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी या रेतीच्या मालकाचा शोध घेतला. मात्र, कोणीही मिळून न आल्याने ही रेती जप्त केली आहे.
जवळपास 125 ब्रास पेक्षा जास्त रेतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची ही रेती असल्याची माहिती आहे. तेल्हारा तालुक्यामध्ये रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात नदीमधून रेती काढण्यात येत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे रेतीचा अवैधरित्या साठा करून त्याची विक्री करण्याचा रेती माफियांचा प्रयत्न उधळला गेला. तालुक्यात कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना तालुक्यातील मौजे वांगरगाव शिवारात एकाच ठिकाणी सुमारे 125 ब्रास रेतीचा साठा आढळून आला. तेल्हारा तहसिलचे नायब तहसिलदार दिपक जरे यांनी या ठिकाणी छापा टाकून जमा केलेला रेतीचा विशाल ढीग जप्त केला.
जप्त केलेला माल उचलून तेल्हारा तहसिल कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. तसेच निनावी वाहनाव्दारे होत असलेली अवैध रेतीची वाहने महसूल विभागाने पकडली असून त्या वाहनावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी तलाठी मांडवे, तलाठी अंकुश मानकर, तलाठी शिवानंद तेलगोटे, तलाठी मानवतकर महेश राठोड, गद्रे, साबे, गणेश वानखडे उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यांमध्ये रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्यामुळे रेती माफियांचे चांगभले सुरू आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील बांधकामांमध्ये ही रेती छुप्या पद्धतीने बांधकामाच्या ठिकाणी पोहोचविल्या जात आहे. महसूल विभागाच्या डोळेझाकपणामुळे रेती माफियांचे चांगलेच फावत आहे. अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन जिल्हाभरात सुरुुरू असताना मात्र सबंधित विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. परिणामी, शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.