कराची - इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा वेगवान मोहम्मद आमिर याचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्याच्या जागी १९ वर्षीय मोहम्मद हसनैन याची वर्णी लागली आहे. आमिरचा पत्ता कट झाल्याने पाकिस्तानमधील फॅन्समध्ये २ गट पडले आहेत. काहींनी निवड समितीने आमिरला जाणून बूजून डावल्याचे म्हटले आहे, तर काहींनी निवड समितीचा निर्णय संघाच्या हिताचा असल्याचे म्हणत आहे.
मोहम्मद हसनैन हा १५० किमी वेगाने गोलंदाजी करतो. अचूक मारा, योग्य बाउंसर, परफेक्ट यॉर्कर ही या गोलंदाजाची वैशिष्ट्ये आहेत. पाकिस्तामधील हैदराबादच्या गल्लीत मोठा झालेला हा गोलंदाज आज पाककडून विश्वचषकाच्या संघात खेळणार आहे. मोहम्मदन शोएब अख्तर, मोहम्मद समी आणि वकार युनूस या गोलंदाजांचे व्हिडिओ पाहून गोलंदाजी शिकला आहे.
नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने १७.५८ च्या सरासरीने १२ गडी बाद केले आहेत. अंतिम सामन्यात ३ गडी बाद करत सामानावीरचा किताब पटकाविला.
हसनैन याने २०१५ साली ऑस्ट्रेलियात एक सामना खेळला होता. तेथे त्याची गोलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज स्टीव्ह वॉ प्रभावित झाला होता. वॉने त्याचे कौतुक करताना तो म्हणाला की, हा गोलंदाज एक दिवस पाकिस्तानच्या संघात खेळताना दिसून येईल. हसनैनजवळ वेग आहे, पण वयाच्या १९ व्या वर्षीच तो कमरेच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यासाठी त्याला फिटनेसवर भर देणे गरजेचे आहे.