नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ ५ दिवस शिल्लक आहेत. तर, मागील १ महिन्यापासून देशभरात आचार संहिता लागू झाली आहे. मात्र, रल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवर भाजप 'फ्री' प्रचाराचा आनंद घेत आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने नोटीस बजावूनही अधिकारी यावर कारवाई करण्यापासून दुर्लक्ष करत आहेत.
निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात आचार संहिता लागू केली होती. या काळात कोणत्याही सरकारी कामांची जाहिरात करण्यार बंदी असते. मात्र, राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्थानकांवर वेगळेच चित्र आहे. येथे पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकाळात केलेल्या अनेक कामांचे पोस्टर आताही पाहण्यास मिळत आहेत. याबद्दल निवडणूक आयोगाने रेल्वे प्रशासनाना नोटीस बजावली आहे. मात्र, अधिकारी यावर दुर्लक्ष करत आहेत.
दिल्ली रेल्वे स्थानकासह हजरत निजामुद्दीन आणि इतर ठिकाणीही असे पोस्टर पाहण्यास मिळत आहेत. मागच्या वेळी रेल्वेच्या चहाच्या कागदी कप आणि तिकिटावरही मोदींची जाहीरात केली होती. त्यावरुन त्यांना आयोगाने मोदींना उत्तर मागितले होते.
रेल्वे भारत सरकारच्या अखत्यारीत येते. स्थानकावर अनेक प्रवासी येत असतात. तर, राजधानी दिल्लीमध्ये संपूर्ण देशातील लोक येतात. अशावेळी मोदींचा फोटो असलेल्या या पोस्टरवर प्रवाशांचे सहज लक्ष जाते. अनेकवेळा कारवाई करुनही भाजप पुन्हा-पुन्हा नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. मात्र, यावर आता आयोग कोणत्या प्रकारची कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे.