गेवराई (बीड) -कोरोनो महामारीची दुसरी लाट आली ती अत्यंत भयानक आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक गावाने एकत्र येऊन कोरोनो महामारीची सामना करणे आवश्यक आहे. आज भेंड खुर्द येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातच कोविड सेंटर सुरू केले आहे. भेंड खुर्द गावाचा आदर्श घेत प्रत्येक गावाने एकत्र येऊन गावपातळीवर कोविड सेंटरची उभारणी केली तर कोरोनो महामारीचे संकट लवकरच जाईल, असा विश्वास आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला.
आमदार लक्ष्मण पवार यांनी तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांच्यासह रविवारी भेेंड खुर्द येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी तेे बोलत होते.
पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की, भेंड खुर्द येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोविड सेंटर सुरू केले आहे. ग्रामस्थांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. गावपातळीवर कोविड सेंटर सुरू केले तर लक्षणे नसलेले रुग्ण येथेच उपचार घेऊन कोरोनोवर मात करण्यात यशस्वी होतील. कारण लक्षणे नसलेल्या रुग्णांना जर रुग्णालयात उपचार सुरू केले तर तिथे रुग्णाच्या मनावर दडपण येते. पण त्याच रुग्णाला जर गावातच उपचार मिळाला तर रुग्णाच्या मनावर दडपण येत नाही. त्यामुळे रूग्ण बरा होऊन कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो.
जर गावपातळीवर अशा पद्धतीने कोविड सेंटर सुरू झाले तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना गेवराई किंवा बीड येथे उपचार घेण्यासाठी जाण्याची वेळ येणार नाही असे मतही आमदार लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कोरोनो रुग्णांची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. अशा परिस्थितीत गेवराईत आतापर्यंत 6 कोविड सेंटरची उभारणी केलेली आहे. तरीसुद्धा रुग्णांना बेड कमी पडत आहेत. अशा वेळी भेंड खुर्द येथील युवकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन भुमी प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने गावपातळीवर १ मेला कोविड सेंटर सुरू केले. याबबत माहिती मिळताच आमदार लक्ष्मण पवार यांनी तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांच्यासह रविवारी या कोविड सेंटरला भेट दिली.
यावेळी तहसीलदार सचिन खाडे, वैद्यकीय अधीक्षक चिचोले, तालुका आरोग्य अधिकारी कदम, गटविकास अधिकारी सानप आदी. उपस्थित होते.