सोलापूर : खासगी कामानिमित्त सोलापुरात आलेल्या वन्यजीव छायाचित्रकार आणि अभिनेता मिलिंद गुणाजीला भिगवणजवळ उजनी बॅकवॉटरील पक्षांनी अचानक भुरळ पाडली. त्यामुळं मुंबईकडे परतणाऱ्या मिलिंदनं मध्येच थांबून या परिसरातील पक्षांची छायाचित्रे टिपली.
यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्र आणि स्थानिक पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार होते. कुंभार यांच्या मदतीने पक्षी निरीक्षण करून या परिसरातील अनेक पक्ष्यांना आपल्या कॅमे-यात कैद केले. भल्या सकाळी पळसदेव डिकसळ आणि कोंढार चिंचोलीच्या जुन्या रेल्वे पुलाजवळ भटकंती करुन मिलिंदनं पक्षी निरीक्षण केलं. या मोहिमेत त्यानं शेकडो रोहित पक्षी, हजारोंच्या संख्येने मुग्धबलाक आणि चितबलाक हे करकोचे कॅमेराबद्ध केले.मात्र या पक्षीनिरीक्षणाच्या वेळी स्थलांतरित बदके परत गेल्याने त्यांचं छायाचित्रण करणं राहून गेलं.
उजनी धरण परिसराची भौगोलिक परिस्थिती ही पक्ष्यांसाठी अतिशय अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी पक्षीवैविध्यता आहे. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारने या परिसराला राष्ट्रीय पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावं अन या परिसराच्या संरक्षणाचे काम हाती घ्यावं त्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया ही मिलिंदनं व्यक्त केलीय...