नाशिक- दिंडोरी व कळवण तालुक्याच्या हद्दीवर मार्कंड पर्वत आहे. या पर्वतावरील अतिप्राचीन मार्कंडेय ऋषी मंदिर येथे दर सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते. परंतू यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यात्रेला नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. परंतू या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळावर गर्दी होऊ नये, यासाठी वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्कंडेय ऋषी डोंगराच्या चारही बाजूने रस्ता बंद केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कळवणचे तहसीलदार बी.ए कापसे, तसेच कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी यात्रा उत्सव न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
यानिमित्ताने आज मार्कंडेय ऋषी पर्वताच्या पायथ्याशी बांबूच्या साहायाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने मार्कंडेश्वर ऋषी पर्वताकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. प्रशासनाच्यावतीने कसमादेच्या संपूर्ण भाविक, भक्तांना यानिमित्ताने गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले.