मुंबई - आयपीएलमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्सने हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये २ गडी राखून मात दिली. या सामन्यात हैदराबादचा जरी पराभव झाला असला तरी मनीष पांडेवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबई हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण मनीष पांडेने हार्दिकच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सामना बरोबरीत आणला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला. कालच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करत साऱ्यांची मने जिंकली.
मुंबईच्या विजयाचा घास हिरावून घेणारा पांडे रातोरात सोशल मीडियावर हिरो झाला. मनीष पांडेच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याला विश्वचषकात स्थान देण्याची मागणीही फॅन्स करत आहेत.
कालच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने २० षटकात १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने दमदार सुरुवात केली. त्यानंतर १५ व्या षटकात हैदराबादची स्थिती ५ बाद १०५ अशी होती.
त्यानंतर मनीष पांडे आणि मोहम्मद नबी यांनी मोर्चा सांभाळला. अंतिम चेंडूत ७ धावांची गरज होती. पांडेने हार्दिकच्या चेंडूवर लॉग ऑनच्या दिशेने षटकार खेचत सामना बरोबरीत सोडवला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये मुंबईने बाजी मारली आणि प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले.