बारामती (पुणे) - बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारातील द्राक्ष आणि डाळिंब निर्यात केंद्रातून प्रथमच लंडन येथे समुद्रामार्गे 16 टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. 21 दिवसांच्या सागरी प्रवासानंतर 3 जुलैला बारामती केंद्रातील आंबा इंग्लंड येथील फेलोक्सस्टोव्ह बंदरात पोहोचणार आहे.
सागरी वाहतुकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मर्क्स कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने नियंत्रित वातावरणाच्या कंटेनरमध्ये हा आंबा निर्यात होत आहे. भारतातील एक अग्रगण्य आंबा निर्यातदार रेम्बो कंपनी 2015 पासून बारामती बाजार समितीतील निर्यात केंद्रातून जगभरातील 17 देशात आंबा निर्यात करत आहे.
कोरोना आपत्तीच्या कठीण काळात अनेक आव्हानांचा सामना करत 25 एप्रिल पासून आज तारखे अखेर त्यांनी इंग्लड, स्वित्झरलंड, जर्मनी या देशात हवाईमार्गे 240 टन आणि बुधवारी प्रथमच समुद्रमार्गे 16 टन आंबा निर्यात करण्यात यश आल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत भसाळे यांनी सांगितले.
सागरी मार्गाने आंबा निर्यातीचा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील वर्षी कोकणातील हापूस आणि पुणे, सांगली, सोलापूर तसेच मराठवाडा भागातील केशर आंबा मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करता येईल. हवाई निर्यातीच्या खर्चाच्या मानाने समुद्रामार्गे निर्यात स्वस्त असल्याने युरोपमधील ग्राहकांना वाजवी दरात आंबा निर्यात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे ग्राहक आणखी वाढतील अशी अपेक्षा बारामती बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हवाई मार्गाची अपेक्षित उपलब्धता नसल्याने तसेच हवाई वाहतूक दर जादा असल्याने अनेक देशात आंबा निर्यात होऊ शकला नाही. म्हणूनच सागरी मार्गाचा अवलंब करत बारामती येथील 16 टन आंबा इंग्लंडला रवाना झाला आहे.