पुणे - मुलगी झाल्याच्या रागातून एका माथेफिरूने आरोग्य केंद्रात गोंधळ घालत पत्नीसह आरोग्य सेवकाला मारहाण केल्याची घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे घडली. ही घटना शुक्रवारी (26 जून) घडली असून याबाबत कृष्णा बाळासाहेब काळे (रा. डोर्लेवाडी) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणि मारहाणप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा काळे यांच्या पत्नीने गुरुवारी एका मुलीला जन्म दिला होता. मुलगी झाली म्हणून काळे यांनी आपल्या पत्नीला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच येथे काम करत असणाऱ्या आरोग्य सेवकाला व डॉक्टरांना देखील शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी आरोग्य सेवकाने काळे यांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून काळे यांनी आरोग्यसेवकाला दगडाने मारहाण केली, असे आरोग्य सेवक बाळू नाना चव्हाण यांच्या तक्रारीत सांगण्यात आले आहे.