सातारा- खटाव तालुक्यात मृत संशयित कोरोना रुग्णांवर केवळ वडूज येथेच अंत्यसंस्कार होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंत्यसंस्कारासाठी असणारी स्मशानभूमी लोकवस्ती जवळ असून अंत्यसंस्कार तेथे न करता लोकवस्ती सोडून दुसऱ्या ठिकाणी प्रशासनाने स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडे केली आहे.
याप्रकरणी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय काळे यांनी वडूजकरांच्या भावना नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून शासनास कळवाव्यात, अशी मागणी केली. तर प्रतिबंधात्मक क्षेत्राबाबत व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली असून शहरी नियमांप्रमाणे प्रतिबंधात्मक क्षेत्राची अंमलबजावणी करावी. जिल्हा प्रशासनाने यामध्ये आदेशात अंशतः बदल करून लोकहिताचा व भावनेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी परेश जाधव यांनी केली.
तर, विरोधी पक्ष नेते शहाजीराजे गोडसे यांनी यापुढे असे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत होऊ देणार नाही असा गर्भित इशाराही दिला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय राव काळे, नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते शहाजीराजे गोडसे, नगरसेवक अनिल माळी, माजी उपसरपंच परेश जाधव, शशिकांत पाटोळे, अभय देशमुख, अजित नलवडे, अशोक राऊत (बापू) विक्रम काळे, संतोष हिंगसे, उमेश यादव आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.