वाशिम - शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने 1600 कोटी रुपये पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत संथगतीने कर्ज वाटप सुरू असून आजपर्यंत केवळ 300 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वितरण्च्या एकूण टक्केवारीच्या फक्त 19 टक्के इतकेच कर्ज आतार्पयंत वाटप झाले आहे.
यामध्ये सर्वाधिक 208 कोटी रूपयांचे पीक कर्जाचे वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. तर 17 राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज वितरणाचे प्रमाण केवळ 92 कोटी रूपये इतके आहे. शेतकर्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी कर्ज मिळावे यासाठी सरकारकडून जिल्ह्यातील सर्व बँकाना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप हंगामातील पेरणी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना आणि शेतकर्यांकडून कर्जाची मागणी असताना देखील राष्ट्रीय बँकां शेतकर्यांना पीक कर्ज देण्याबाबत इच्छुक नसल्याचे दिसत आहे.
खरिप हंगामाच्या दृष्टिकोनातून शेतांमध्ये मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आली असली तरी बि- बियाणे, खते यांचा प्रश्न कोरोनामुळे कायम आहे. एकीकडे कोरोनामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. जिल्ह्यात मागील दोन समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयकृत बँकांना आदेश काढून शेतकऱ्यांना वेळेवर पिककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.