चेन्नई - ‘मेरा वचन ही है शासन’ म्हणणाऱ्या बाहुबली फेम दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्रीच्या गाडीत 100 बाटल्या दारू सापडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दारू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या परिस्थितीत शुक्रवारी रात्री अभिनेत्री रम्या कृष्णन हिच्या गाडीमधून 100 हून अधिक दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
रम्या कृष्णन हिच्या गाडीचा ड्रायव्हर पुद्दुचेरीहून चेन्नईला जात होता. चेन्नईमध्ये दारू विक्रीला बंद असताना मुत्तुकाडू चेक पोस्टवर पोलिसांनी दारू तस्करीच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. सेल्वकुमार (वय 38) असे रम्या हिच्या ड्रायव्हरचे नाव असून त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रम्या कृष्णन हिने यावर अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपल्या ड्रायव्हरच्या अटकेच्या काही तासातच रम्याने त्याला जामीनावर सोडवल्यामुळे राज्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्व विक्रम बाहुबली या चित्रपटाने मोडीत काढले होते. याच चित्रपटात बाहुबलीच्या आई शिवगामीची भूमिका रम्या कृष्णन हिने साकारली हेती. या चित्रपटातील तिचे संवाद प्रसिध्द झाले होते.